चाळीसगाव : धुळे येथे प्रस्तावित अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्यालय परस्पर नंदुरबार येथे हलविण्याचा आदेश तात्काळ रद्द करावा, हे कार्यालय धुळे येथेच सुरू करावे. यासंदर्भात आदिवासी विभागाने काढलेले परिपत्रकही आदिवासींवर अन्याय करणारे आहे. तेही मागे घेण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या स्थानिक शाखेने प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना नुकतेच दिले.
धुळे येथे प्रस्तावित पडताळणी समितीचे मुख्यालय २० मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार परस्पर नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे. यामुळे धुळे व जळगाव जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या हजारो आदिवासी बांधव, महिला व विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होणार आहे. जात पडताळणीसाठी नंदुरबार हे ठिकाण जळगाव व धुळे जिल्ह्यांतील आदिवासींसाठी सोयीचे नाही. यामुळे शासनाने आदेश मागे घेऊन ते धुळे येथेच कार्यान्वित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ठाकूर जमातीचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक सूर्यकांत ठाकूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पडताळणी समितीचे नूतन कार्यालय धुळे येथेच सुरू करण्याबाबत धुळे व जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व आदिवासी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.