जळगाव : पंधराव्या वित्त आयोगाच्या जिल्हा परिषदेच्या दहा टक्के निधीतून झालेल्या जिल्हाभरातील विविध कामांनंतर पीएफएमएस प्रणालीच्या अडचणी दूर होऊन अखेर वर्षभरानंतर हा निधी आता कंत्राटदारांच्या खात्यावर पडण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. जिपच्या हिश्श्याचा हा २६ कोटींचा निधी आहे.
सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन राबविली जात असल्याने पीएफएम प्रणालीतून ही कामे व निधीची मंजुरी होत होती. त्यामुळे वर्षभरापूर्वीच्या कामांचीही देयके बाकी होती. यात अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील व बांधकाम समिती सदस्यांनी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर यातील अडचणी दूर झाल्या आहेत. या २६ कोटींच्या निधीतून झालेल्या कामांच्या रकमा या आता थेट संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाल्याचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले. चार टप्प्यांमध्ये बंधित आणि अबंधित, असा हा निधी प्राप्त झाला होता. एकूण निधीच्या दहा टक्के निधी हा जिपचा असतो, तर दहा टक्के हा पंचायत समितीचा असतो.