जळगाव : पाच वर्षांपूर्वी आईचा कर्करोगाने तर वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आता मुलाचा अपघातात मृत्यू झाला. दोन्ही जिवलग मित्रांचा सोबतच मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात कांचन नगर परिसरात दोन अंत्ययात्रा निघाल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती. प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३५, रा. कांचननगर जळगाव) व हर्षल शिवाजी परदेशी (वय २४, रा. हरिओम नगर, कांचन नगर) असे या जिवलग मित्रांची नावे असून पालनजीक सोमवारी रात्री अपघातात ते ठार झाले.
प्रशांत तांदुळकर आणि हर्षल ऊर्फ गोलू परदेशी (वय २४, रा. हरिओम नगर) हे दोघंही जिवलग मित्र. दोघांचेही लग्न झालेले नव्हते. प्रशांत याच्या आई, वडिलांचा पाच वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या घटनेतून भावंडे सावरत नाही तितक्यात लहान भावाचा मृत्यू झाल्याने विनोद व संजय या दोन्ही भावांनी एकच हंबरडा फोडला. विनोद याचे लग्न झालेले आहे तर संजय व प्रशांत अविवाहित होते. प्रशांत हा रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावायचा. हर्षल हा एमआयडीसीतील चटई कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात आई सुनीता, वडील शिवाजी, मोठा भाऊ जितेंद्र असा परिवार आहे. प्रशांत याची अंत्ययात्रा दुपारी दीड वाजता तर हर्षलची अंत्ययात्रा सायंकाळी साडे सहा वाजता काढण्यात आली. एकाच दिवसात दोन अविवाहित तरुणांची अंत्ययात्रा निघाल्याने रहिवाशांनाही गहिवरून आले होते. प्रशांतच्या पश्चात दोन भाऊ, वहिनी व पुतणे असा परिवार आहे.
महादेवाचे दर्शन घेऊन येत असताना झाला अपघात
श्रावण सोमवारनिमित्ताने ते मित्रांसोबत मध्य प्रदेशातील शिरवेल येथे महादेवाच्या दर्शनाला गेले होते. रात्री ११ वाजता हा अपघात झाला. मंगळवारी सकाळी प्रशांत व हर्षल यांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. जखमींवर रावेरला उपचार सुरू आहेत.