जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात सोमवार, २६ जुलै रोजी घसरण झाली. यामध्ये २७ दिवसांनंतर चांदी ७० हजारांच्या खाली येऊन ६९ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. अशाच प्रकारे सोनेदेखील ४९ हजारांच्या खाली येऊन ४८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आली. यात १ जुलै रोजी ४८ हजार २०० रुपये असलेले सोने २३ जुलैपर्यंत ४९ हजारांवर पोहोचले. त्यानंतर २४ व २५ रोजी सुवर्ण बाजार बंद राहीला व २६ रोजी सुवर्ण बाजार उघडताच सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यात २०० रुपयांची घसरण होऊन ते ४८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर आले. अशाच प्रकारे १ जुलै रोजी ७० हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीत भाववाढ होत जाऊन ती ७१ हजारांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर ती २३ रोजी ७० हजारांवर आली. सोमवार, २६ जुलै रोजी त्यात पुन्हा ३०० रुपयांची घसरण होऊन ती ६९ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर आली. २९ जून रोजी ६९ हजार ५०० रुपयांवर असणारी चांदी आता २७ दिवसांनी पुन्हा ७० हजारांच्या खाली आली आहे.