लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महिनाभरापूर्वी कुत्र्याने चावा घेतलेल्या अनिल मिश्रा या (वय ४५, रा.खंडेराव नगर) प्रौढाचा गुरूवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना बुधवारीच या ठिकाणी दाखल करण्यात आले होते, मात्र, त्यांच्यावर कसलेच उपचार करण्यात आलेले नाही, असा आरोप त्यांच्या पत्नीने केलेला आहे. मात्र, रुग्णाला हायड्रोफोबिया होता व तो अत्यंत गंभीरावस्थेत दाखल झाला होता. असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
अनिल मिश्रा हे रेल्वे मालधक्क्यावर हमालीचे काम करत होते. महिनाभरापूर्वी त्यांना त्या ठिकाणीच कुत्रा चावला होता. त्यावेळी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एक इंजेक्शन घेतले होत. त्यानंतर ते घरी निघून गेले होते. मात्र, बुधवारी त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास व्हायला लागल्याने त्यांना जीएमसीच्या ९ नंबर कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांना बांधून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्या पत्नी सविताबाई मिश्रा या होत्या. मात्र, गुरूवारी सकाळी अनिल मिश्रा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, उपचार न मिळाल्याचा हा आरेाप अगदी बिनबुडाचा असून रुग्ण अतिशय गंभीर परिस्थिती आमच्याकडे दाखल झाला होता. त्यांना महिनाभरापूर्वीच कुत्रा चावला होता. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही कुटुंबियांना कल्पना दिली. शिवाय सर्व डॉक्टरांनी चर्चा केली होती. रुग्णाला हायड्रोफोबीया होता त्यातच रुग्ण दगावला, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.