परिसरातील महिलांचाही विरोध झुगारला : नागरिकांमध्ये संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिका कर्मचारी असल्याचे सांगत शहरातील आदर्शनगर भागातील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील उद्यानातील २० ते ४० वर्षे जुन्या १० वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे याबाबत मनपा अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनाही या प्रकाराबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे नाव सांगून, शहरातील विविध भागांत वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आदर्शनगरातील जुने आरटीओ कार्यालयाजवळील उद्यानात काही जणांकडून वृक्षतोड सुरू असल्याचे काही महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर परिसरातील सर्व घरांमध्ये विचारपूस करून हे वृक्ष तोडण्याबाबत मनपाकडे तक्रार केली होती का ? याबाबत विचारणा केली. त्यात वृक्ष तोडण्याबाबत कोणीही मनपाकडे तक्रार केली नसल्याचे आढळून आले. त्यानंतर या महिलांनी उद्यानात जाऊन वृक्ष तोडणाऱ्यांना विचारणा केली असता, संबंधितांनी मनपा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यात परिसरात यावेळेस पुरुष मंडळी नसल्याने महिलांनी या वृक्षतोडीला विरोध केला. मात्र, या विरोधाला झुगारून याठिकाणचे १० वृक्ष तर काही वृक्षांच्या फांद्या तोडण्यात आल्या.
कोणतीही समस्या नसताना वृक्ष का तोडले ?
आदर्शनगरातील नागरिकांनी सांगितल्यानुसार उद्यान परिसरात महावितरणच्या तारादेखील गेल्या नव्हत्या. तसेच या भागातील कोणत्याही नागरिकाने याबाबत तक्रार केली नव्हती. तसेच हे वृक्ष धोकेदायक अवस्थेतदेखील नव्हते. असे असतानादेखील या वृक्षांची कत्तल का करण्यात आली? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, याठिकाणाहून वृक्षांची कत्तल करून, दोन ट्रॅक लाकूड नेण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
कोट..
महापालिकेकडून याबाबत परवानगी देण्यात आली होती की नाही? याबाबत संबंधित भागातील अभियंत्याला विचारणा केली जाणार आहे. त्यानंतरच याबाबत चौकशी करण्यात येईल.
-चंद्रकांत सोनगिरे, अभियंता