जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रवेशासाठी प्रवेश पूर्वपरीक्षेचे (पेट परीक्षा) आयोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले आहे.
पीएच.डी. प्रवेश पूर्वपरीक्षेकरिता २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध असणार आहे. संबंधित उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन भरून सर्व संबंधित व आवश्यक कागदपत्रे जोडून या ऑनलाइन अर्जाची प्रत विद्यापीठातील संशोधन विभागात २३ ऑक्टोबरपर्यंत सादर करावयाची आहे. परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी ही ३० ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. त्यावर आक्षेप १ नोव्हेंबरपर्यंत घेता येतील. त्यानंतर परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. परीक्षेची अंतिम तारीख २३ ते २६ नोव्हेंबर अशी राहणार आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक व सूचना विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पीएच.डी. प्रवेशासाठी इच्छुकांनी आपले अर्ज ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन संशोधन विभागाचे सहाय्यक कुलसचिव व्ही. व्ही. तळेले यांनी केले आहे.