अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत या योजनेचे संपूर्ण कामदेखील पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील ५० टक्के भागातील सांडपाणी वाहून शिवाजीनगरातील जुन्या खत कारखान्याच्या सुमारे १० एकर जागेवर तयार होत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पात जाऊन त्या ठिकाणी या पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पाचे कामदेखील ९० टक्के पूर्ण झाले असून, काही महिन्यांत हा प्रकल्प पूर्णपणे तयार होऊन, या ठिकाणी शहरातील ४० लाख लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.
शहरातील ५० टक्के भागातील सांडपाणी या मलनिस्सारण प्रकल्पात जमा होणार आहे. या प्रकल्पात जमा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ६० ते ६५ टक्के शुद्ध पाण्याचा वापर औद्याेगिक व कृषी क्षेत्रासाठी होणार आहे. हे पाणी मनपा प्रशासनाकडून विक्री करून या पाण्याद्वारे मनपाला उत्पन्नदेखील मिळणार आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाकडे दीपनगर औष्णिक प्रकल्पासाठीदेखील या पाण्याच्या मागणीचा प्रस्तावदेखील मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाला होता. यावरदेखील मनपा प्रशासनाकडून विचार सुरू आहे. या प्रक्रिया झालेल्या पाण्यातूनदेखील मनपाला चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.
मलनिस्सारण प्रकल्पाची माहिती
भुयारी गटार योजनेचे आतापर्यंत झालेले काम - ८० टक्के
एकूण योजनेचा खर्च - १९५ कोटी
मुदत - सप्टेंबर २०२१
मक्तेदार - एल.सी. इन्फ्रास्ट्रक्चर, अहमदाबाद
जलवाहिनी टाकण्याचे काम - २०३ किमीपैकी १५० किमी
-मलनिस्सारण प्रकल्पाला एकूण खर्च ४७ कोटी इतका अपेक्षित आहे
-या प्रकल्पाची एकूण क्षमता ४२ लाख लीटर इतकी आहे.
-शहरातील ५० टक्के भागातील सांडपाण्यावर या प्रकल्पात होणार प्रक्रिया
-आतापर्यंत ९० टक्के काम झाले पूर्ण
-शिवाजीनगर भागातील जुन्या खत कारखान्याच्या जागेवर सुमारे १० एकराच्या जमिनीवर प्रकल्पाचे काम सुरू
- दोन मोठ्या विहिरींमध्ये जमा होणार पाणी, चार केंद्रांमध्ये होणार प्रक्रिया
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, दुसरा टप्पा मात्र अधांतरीच
१. भुयारी गटार योजनेंतर्गत शहरासाठी पहिल्या टप्प्याची योजना मंजूर झाली होती. शहराच्या उर्वरित भागासाठीचे काम दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. मात्र, मनपाकडे दुसऱ्या टप्प्यासाठी करावयाच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठीची जागा नाही.
२. त्यामुळे मनपा प्रशासनाने दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी शासनाकडे प्रस्तावदेखील पाठविलेला नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम संपण्यात आले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील काम अजून काही वर्षे होणे कठीण आहे.