येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाचोरा शाखेतील ग्राहक सूर्यभान बाविस्कर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. केवळ बँकेत बचत खाते असल्याचा फायदा परिवाराला मिळवून देत येथील बँकेच्या व्यवस्थापनाने अथक परिश्रम करून मयत सूर्यभान बाविस्कर यांच्या परिवाराला पाच लाख रुपये विमा रक्कम मिळवून दिली आहे. बँकेत बचत खाते असून त्याद्वारे तुम्ही एटीएम कार्ड वापरत असाल तर प्रत्येक जुन्या एटीएम कार्डधारकाला एक लाख रुपयाचे तर नवीन प्लॅटिनम एटीएम कार्डधारकाला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. पाचोरा येथील प्रकरणात संबंधित विमाधारकाकडे जुने एटीएम कार्ड असल्याने एक लाख रुपयाचा विमा त्याच्या वारसांना मिळाला.
बँकेच्या ग्राहकाला न्याय मिळवून देणारे शाखा व्यवस्थापक जयंत अमृतकर, बँक अधिकारी प्रसाद दुसाने, रोखपाल मंदार साखरे व विशेष मेहनत घेणारे कंत्राटी सेवक हितेश महाजन यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.