लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. शिवाजीनगरातील जुन्या खत कारखान्यातील सुमारे १० एकर जागेवर तयार होणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाचे कामदेखील ६० टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील सुमारे ४२ लाख लीटर वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर या प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे नदी, नाल्यांमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर भविष्यात शेतीसाठी केला जाणार आहे. तसेच या पाण्याव्दारे मनपा प्रशासनाला उत्पन्नाचा नवा स्त्रोतदेखील मिळणार आहे.
भुयारी गटार योजनेचे आतापर्यंत झालेले काम - ६५ टक्के
एकूण योजनेचा खर्च - १९५ कोटी
मुदत - सप्टेंबर २०२१
मक्तेदार - एल.सी.इन्फ्रास्ट्रक्चर, अहमदाबाद
जलवाहिनी टाकण्याचे काम - २०३ किमीपैकी ११० किमी
-मलनिस्सारण प्रकल्पाला एकूण खर्च ४७ कोटी इतका अपेक्षित आहे
-या प्रकल्पाची एकूण क्षमता ४२ लाख लीटर इतकी आहे.
-शहरातील ५० टक्के भागातील सांडपाण्यावर या प्रकल्पात होणार प्रक्रिया
-आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून, जुलैपर्यंत प्रकल्प होणार कार्यान्वित
-शिवाजीनगर भागातील जुन्या खत कारखान्याचा जागेवर सुमारे १० एकराच्या क्षेत्रावर प्रकल्पाचे काम सुरू
- दोन मोठ्या विहिरींमध्ये जमा होणार पाणी, चार केंद्रांमध्ये होणार प्रक्रिया
काय होणार फायदा
१. शहरातील जे सांडपाणी नाल्यावाटून गिरणा नदीपात्रात जात होते, ते पाणी आता नदीत जाणार नाही.
२. नदीमध्ये होणारे जलप्रदूषण थांबेल
३. शहरातील लेंडीनाल्यातील ७० टक्के पाणी कमी होईल, लेंडी नाल्यातून केवळ पावसाचे पाणी जाणार
४. लेंडी नाल्यामुळे शहरातील होणारे जल व वायू प्रदूषणातदेखील मोठी घट होईल.
सांडपाण्याचा वापर औद्योगिक व शेतीसाठी होणार
शहरातील ५० टक्के भागातील सांडपाणी या मलनिस्सारण प्रकल्पात जमा होणार आहे. या प्रकल्पात जमा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ६० ते ६५ टक्के शुध्द पाण्याचा वापर औद्यागिक व कृषी क्षेत्रासाठी होणार आहे. हे पाणी मनपा प्रशासनाकडून विक्री करून या पाण्याव्दारे मनपाला उत्पन्न देखील मिळणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात दुसरा प्रकल्प होणार सुरू
शहरात भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या उर्वरित भागासाठी दुसऱ्या टप्प्याचे काम मंजूर होऊन सुरू होईल. त्यानंतर दुसऱ्या प्रकल्पाचे काम देखील सुरू होणार असून, त्यानंतर उर्वरित भागातील सांडपाण्यावर देखील प्रक्रिया होऊन गिरणा नदी, मेहरूण तलावात जाणाऱे दूषित पाणी थांबून पर्यावरणाचा होणारा ऱ्हासदेखील थांबणार आहे.
कोट..
मलनिस्सारण प्रकल्पाचे काम जवळपास ६० टक्के झाले असून, जुलै २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के भागातील सांडपाण्यावर या प्रक्रिया होणार आहे. शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
-अरविंद भोसले, शहर अभियंता, मनपा