लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदाच्या शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली आहे; मात्र जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या लाभार्थी ४ लाख २२ हजार ४०३ विद्यार्थ्यांसाठी अद्याप जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक योजनेसाठी पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यासाठी बालभारतीकडे पुस्तकांची मागणी केली आहे. आठवडाभरात ही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर त्याचे प्रत्येक तालुक्यांना वितरण होणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. यंदा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी जिल्ह्यातील ४ लाख २२ हजार ४०३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप केले जाणार आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाते. परंतु, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या. तर पुस्तक छपाईलासुद्धा उशिर झाला. परिणामी, शाळा उघडून आता एक महिना झाला आहे;मात्र अजूनही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळालेले नाही.
गेल्यावर्षीच्या पुस्तकांचा आधार
पाठ्यपुस्तकच नसल्याने शिक्षक अध्यापन कसे आणि विद्यार्थी ऑनलाइन वर्गात अध्ययन करणार कसे असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान, शासनाने पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शाळांना परत करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गतवर्षीच्या पुस्तकांचा अध्यापन-अध्ययनासाठी आधार शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
आठवडाभरात प्राप्त होणार पुस्तक
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने बालभारतीकडे पुस्तकांची मागणी केली आहे. ही पुस्तके आठवडाभरात जिल्ह्याच्या केंद्रावर प्राप्त होतील. त्यानंतर तालुकास्तरावर वितरित केली जाणार आहेत. प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तक पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे.
पाठ्यपुस्तक लाभार्थी संख्या
अमळनेर - २१९६४
भडगाव - १९१०१
भुसावळ - २७५०९
बोदवड - १०२३३
चाळीसगाव - ५६५९१
चोपडा - ३९८९१
धरणगाव - १८९२६
एरंडोल - १९८३९
जळगाव - २१५१२
जामनेर - ४७१९३
मुक्ताईनगर - १८०५२
पाचोरा - ३५२२३
पारोळा - २३९१३
रावेर - २१५९६
यावल - २९२५८
-------
माध्यमनिहाय विद्यार्थी संख्या
मराठी - ३,७१,९७१
उर्दू - ४७,३०८
हिंदी - १,५६२
इंग्रजी - १,५६२