लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ, पूर यामुळे झालेल्या नुकसानीचे ७४ कोटी ८८ लाख रुपये तर २०१७ पासून जिल्ह्यात झालेल्या नुकसानभरपाईचे प्रलंबित १०२ कोटी ९ लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ हा निधी प्रदान करण्याचे निर्देश दिले.
जानेवारी ते सप्टेंबर २०२१ मध्ये ३ कोटी ४३ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यातील ६७ कोटी ५७ लाख रुपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. यंदा घरांची पडझड, पशुहानी यासाठीचे ७ कोटी ३१ लाखांची मदतही प्रलंबित आहे.
यासोबतच २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर बोंडअळींमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३६ कोटी ४० लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यातील ११ कोटी ७० लाख रुपयांची मदत बाकी आहे. २०१८च्या खरीप हंगामातील दुष्काळाच्या मदतीतील ५० कोटी ७३ लाखांची मदत अद्याप बाकी आहे.
ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीपैकी ४ कोटी ३३ लाख रुपयांची मदत बाकी आहे.
जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ३५ कोटी ३१ लाख रुपयांची मदत अजून बाकी आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित केला. यावर चर्चा होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाने आजची बिकट स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यास हा निधी देण्याचे निर्देश दिले.