जळगाव : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार जागांसाठी १ हजार ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी ९८० अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रथम व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया समन्वयक पी.पी.गडे यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यात पॉलिटेक्निकची १३ तर फार्मसीची १३ अशी एकूण २५ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठीची प्रक्रियेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करण्याबाबत सविस्तर वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले होते. त्यातच विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-स्क्रूटिनी'चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे.
१३ एफसी केंद्रांमार्फत अर्जांची तपासणी
प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्राप्त होणा-या अर्जांची पडताळणी करण्यासाठी १३ एफसी केंद्र सुरू करण्यात आली. आतापर्यंत १ हजार ७०० अर्ज जिल्हाभरातून प्राप्त झाले आहे. त्यापैकी ९८० अर्जांची एफसी केंद्रांमार्फत पडताळणी झाली आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शाळेचा दाखला व निकालाची आवश्यकता नाही. सदर विद्यार्थ्यांचे गुण हे थेट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बोर्डाकडून घेवून गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
असा भरता येणार अर्ज
सीबीएसई व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केवळ नोंदणी करता येत आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना संपूर्ण अर्ज भरता येणार आहे.
असे आहे वेळापत्रक
प्रवेश अर्ज नोंदणी : ३० जून ते ३० जुलै
प्रवेशासाठी कागदत्रांची पडताळणी व निश्चिती : ३० जून ते ३० जुलै
तात्पुरता गुणवत्ता यादी : २ ऑगस्ट
अर्ज दुरूस्त करणे : ३ ते ५ ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी : ७ ऑगस्ट