आमदार भोळेंनी मतदानासाठी केला वापर : गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाकडून १४ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांवर अन्यायकारक बिलं लादण्यात आली आहेत. ही बिलं गाळेधारक भरूच शकत नसून, मनपा प्रशासन मात्र हेतुपुरस्सर गाळेधारकांवर अन्याय करत आहे. मनपा प्रशासनाने सोमवारपासून गाळेधारकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मनपाच्या या आदेशाविरोधात १४ मार्केटमधील गाळेधारकांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन केले जाणार असून, १२०० गाळेधारक आपली दुकाने बंद ठेवून दुकानांबाहेर बसून प्रशासनाचा निषेध करणार असल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली आहे.
मनपा उपायुक्तांनी बुधवारी मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्यानंतर दुपारी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, पंकज मोमाया, तेजस देपुरा यांच्यासह विविध मार्केटमधील गाळेधारकदेखील उपस्थित होते. गाळेधारकांनी मनपा प्रशासनाकडे थकीत भाडे भरण्यास नकार दिला नाही. मात्र, हे भाडे २०१२च्या भाडेपट्ट्यानुसार घेण्यात यावेत, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडेदेखील अनेक वेळा निवेदनदेखील दिले आहे. मात्र, मनपा प्रशासन रेडीरेकनरच्या दरावर ठाम असून, या दरानुसार १४ मार्केटमधील गाळेधारक रक्कम भरू शकत नसल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
बाकीच्या मार्केटबाबत जे काही करायचे असेल तर करा
१४ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपा प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घ्यावा, इतर मार्केटबाबत जो निर्णय घ्यायचा आहे. तो मनपाने घ्यावा असेही डॉ. शांताराम सोनवणे यांनी सांगितले. लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार असून, तोपर्यंत मनपाने कारवाईची मोहीम थांबवावी असेही म्हटले आहे. यासह मनपाने लादलेल्या अवाजवी बिले लादली असून ही गाळेधारक भरू शकत नाहीत असेही गाळेधारकांनी सांगितले.
आमदारांनी मतदानासाठी केला वापर
गाळेधारकांच्या प्रश्नी आमदार सुरेश भोळे यांनी गाळेधारकांना केवळ आश्वासने दिली असून, आमदार भोळे यांनी गाळेधारकांचा वापर केवळ मतदानासाठी करून घेतला. भोळे यांनी आमचा विश्वासघात केला आहे. राज्यात सरकार असताना ते काही करू शकले नाही. आता विरोधात असताना काय प्रश्न मार्गी लावतील असेही गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारपासून बंद पुकारण्यात येणार असून, मनपाने कारवाई केल्यास कुटुंबीयांसोबत तीव्र आंदोलन छेडू, असाही इशारा गाळेधारकांनी दिला आहे.