अंबड रस्त्यापासून काही अंतरावरच असलेल्या सामनगाव रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी एका ४५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह पुलाच्या बाजूला आढळून आला होता. जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या महिलेचा मृतदेह ओळख पटविण्यासाठी सामान्य रुग्णालयात ठेवला होता. गुरुवारी दिवसभर पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलेची ओळख पटली नाही. त्यामुळे तालुका पोलिसांनी शुक्रवारी या महिलेची उत्तरीय तपासणी करून अंत्यविधी केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका तुपे आणि पोलीस कॉन्स्टेबल काकड यांची उपस्थिती होती.
परजिल्ह्यातून आणून टाकला मृतदेह
त्या महिलेचा मृतदेह गुरूवारी पहाटे तीन -चार वाजेच्या सुमारास आणून टाकला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच हा मृतदेह पुलाच्या कठड्यावर ठेवून अलगदपणे खाली सोडला असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, ज्या महिलेचा मृतदेह सापडला आहे ती महिला सुमारे ४५ वर्षांची विवाहित महिला असल्याचे पुढे आले आहे. मात्र, या महिलेच्या अंगावर असलेले मंगळसूत्र, बोटातील अंगठी आणि पायामधील पैंजणे हे दागिने सोन्या-चांदीचे नसून, बाजारामध्ये हातगाडीवर मिळणारे साधे दिखाऊ दागिने असल्याचे समोर आले आहे.