जिल्ह्यात ५८ हजार क्विंटल मका खरेदी
जालना : शासनाच्या वतीने जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव मका खरेदी केंद. सुरू करण्यात आली आहेत. यात १ हजार ४१२ शेतकऱ्यांकडून ५८ हजार १८१ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली.
नवदृष्टी अभियानातील डॉक्टरांचा सत्कार
अंबड : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या नवदृष्टी अभियानांतर्गत तालुक्यातील १५ हजार वयोवृध्दांची नेत्रतपासणी करण्यात आली होती. या तपासणीनंतर १३०० रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील एक हजार शस्त्रक्रीया पूर्ण झाल्या आहेत. या अभियानात सहभागी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमास अभियानात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दारूची वाहतुक करणारे दोघे अटकेत
आष्टी : येथील आनंदगाव रस्त्यावर देशी दारूची अवैध वाहतूक
करणाऱ्या दोघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ११ हजार रूपयांच्या देशी दारूच्या बाटल्या व एक दुचाकी
असा एकूण ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रवी वाहूळ व कबीर पठाण अशी
अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
मासेगाव आरोग्य उपकेंद्रात लसीकरण
घनसावंगी : तालुक्यातील मासेगाव आरोग्य उपकेंद्रात पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. मोहिमेचा शुभारंभ प्रयागबाई पुरी व ज्ञानेश्वर आनंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हनुमंतराव आनंदे, विमलबाई शिकारे, शिवकन्या साबळे, द्रोपदा कोळे, सुमित्रा पिंपळे, आरोग्य सेवक घुगरे आदींची उपस्थिती होती. गावातील बालकांना डोस पाजण्यात आला.