जालना : जालना शहराजवळील जामवाडी तलावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तलावात पडलेल्या मुलीला वाचविताना बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. शेख जमिला शेख अमिर (३०) असे मयत महिलेचे नाव आहे.
शेख जमिला शेख अमीर व काजल राजू मंजूळकर (१३) या दोघी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जामवाडी तलावात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे धूत असताना काजलचा पाय घसरून ती खोल पाण्यात बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी शेख जमिला शेख अमीर या पाण्यात गेल्या. तिला वाचविण्याच्या नादात शेख जमिला यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काजलने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शेख जमिला शेख यांचा मृतदेह बाहेर काढला. काजल मंजूळकर हिला जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जमिला शेख यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.