तळणी : मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा नदीपात्रातून विना राॅयल्टी वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने गुरुवारी सकाळी तळणी येथे पकडले.
मागील दोन महिन्यांपासून हे ट्रॅक्टरधारक महसूलच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवून अवैध वाळूची चोरी करीत होते. मात्र, गुरुवारी सकाळी हे ट्रॅक्टरधारक पूर्णा नदीपात्रात उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सुमन मोरे व तलाठी नितीन चिंचोले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मधुकर विश्वनाथ सरकटे (रा. तळणी) व बबनसिंह चव्हाण (रा. तळणी) यांचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. दोन्ही ट्रॅक्टर तळणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. महसूलच्या या कारवाईमुळे वाळू माफियात एकच खळबळ उडाली आहे.
तळणी येथे अवैध वाळूसाठे सुरू
तळणीसह परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळूसाठे जप्त केले जात आहेत. हे वाळूसाठे बेकायदेशीर असून, मंठा महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून अवैध वाळूसाठे जप्त करावेत, अशी मागणी होत आहे.