केदारखेडा ( जालना) : हॉलतिकिट घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यासह मित्राच्या दुचाकीला मानव विकासच्या बस चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास केदारखेडा-राजूर महामार्गावर घडली. या भीषण अपघातात दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. यात विकी कैलास जाधव (वय २०, रा. चंदनझिरा, ता. जालना) व भूषण गंगाधर लोखंडे (वय १८, रा. अवघडराव सावंगी) अशी मृतांची नावे आहेत.
भूषण लोखंडे जालना येथील शासकीय आयटीआय कॉलेजचा विद्यार्थी असून, हॉल तिकीट घेण्यासाठी जालन्याकडे जात होता. विकी हा भोकरदन येथून भूषणला घेऊन दुचाकी (एमएच-२१ बीडब्ल्यू-८३३२) वरून जालन्याला जात होते. राजुर येथील मित्र दुसऱ्या गाडीवर तर, विकीच्या गाडीवर अवघडराव सावंगी येथील मित्र भूषण होता. ते जालना येथे शासकीय आयटीआय विद्यालयात हॉल तिकीट घेण्यासाठी जात होते. यादरम्यान, केदारखेडा जवळील रोकोडोबा जिनिंगजवळ पोहोचताच गव्हाण संगमेश्वर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या मानव विकासच्या बस (एमएच-०६-एस-८७००) ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी रक्ताचा सडा पडला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित बस ताब्यात घेण्यात आली असून, बसचा चालक भानुदास पगारे हा अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शासकीय आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बस दोनशे फुटांवर जाऊन थांबलीबसचालकाने पाठमागून दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, ही बस त्यांना चिरडून दोनशे फुटांवर जाऊन थांबली होती. अपघातीतील विकी जाधव हा एकुलता एक होता. या दोन्ही मित्रांचे मृतदेह भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात हलिविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.