जालना जिल्ह्यात १,२८० रेशन दुकानदार आहेत. या दुकानांमार्फत जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २५१ कार्डधारक कुटुंबांना अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, शेतकरी योजना या योजनांच्या माध्यमातून दरमहिन्याला रेशन दिले जात आहे. यात गहू, तांदूळ व तूरडाळीचा समावेश आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून शासनाने तूरडाळ बंद केली आहे. त्यामुळे लाभार्थींना तूरडाळ दिली जात नाही. तूरडाळ मिळत नसल्याच्या बहुतांश तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात १६ लाख ९१ हजार ९२० लाभार्थी आहेत.
रेशनवर काय मिळते
सध्या अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येक कार्डधारकाला २३ किलो गहू, १२ किलो तांदूळ, एक किलो साखर दिली जाते. प्राधान्य योजनेअंतर्गत ३ किलो गहू, २ किलो तांदूळ व शेतकरी योजनेअंतर्गत तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिले जातात.
लाभार्थ्यांना मिळणार मका
रेशन कार्डधारकांना आता तूरडाळीऐवजी मका दिली जाणार आहे. मार्च महिन्यापासून प्रत्येक लाभार्थीला मका दिली जाणार आहे. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना ९ किलो मका, तर प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना १ किलो मका दिली जाणार आहे.