जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर आणि अंबड या नगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. गत दोन दिवसात एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केलेला नाही. या निवडणुकीत माजी केंद्रीय, राज्य मंत्र्यांसह खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषत: सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर आणि अंबड या तीन नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांचा भोकरदन हा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवेही याच मतदार संघात राजकीय जोर लावतात. २००१ ते २००६ या कालावधीत भाजपची सत्ता होती. नंतर मात्र गत तीन टर्मपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नगरपालिकेवर सत्ता कायम ठेवली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी शहरातील राजकीय संघटन मजबूत करीत भाजप आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले आहे.
दुसरीकडे परतूर नगरपालिकेवर माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी आपल्या गटाचे वर्चस्व कायम ठेवले आहे. जेथलिया हे गत टर्ममध्ये काँग्रेसमध्ये होते. परंतु, त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटात एन्ट्री केली आहे. त्यामुळे इथे काँग्रेसची बाजू कमकुवत झाली आहे. महायुती झाली नाही तर मात्र जेथलियांचे प्रतिस्पर्धी आणि महायुतीतील मित्रपक्ष भाजपचे नेते आमदार बबनराव लोणीकरांचीही प्रतिष्ठा इथे पणाला लागणार आहे.
...अन् टोपेंना सत्तेबाहेर ठेवलेअंबड नगरपालिकेवर यापूर्वीच्या दोन टर्ममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. परंतु, गत निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे यांनी काँग्रेस आणि रासपला सोबत घेऊन राष्ट्रवादीला अन् पर्यायाने टोपे यांना नगरपालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले होते. यंदाच्या निवडणुकीसाठी राजेश टोपे यांनीही जोर लावला असून, इथे आ. कुचे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
काँग्रेसची अधिक कसोटीप्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह संपूर्ण टीमची कसोटीच या निवडणुकीत लागणार आहे. भोकरदनमध्ये देशमुखांचे वलय असले तरी परतूर, अंबडमध्ये निकाल काय लागतो, हे पाहणेही महत्त्वाचे राहणार आहे.
कुठे किती सदस्यभोकरदन- २०परतूर- २३अंबड- २२
Web Summary : Jalna's Bhokardan, Partur, and Ambad municipal elections heat up. Key leaders face a crucial test of strength. No nominations filed in the first two days, raising suspense. Prestige of ministers and MLAs at stake.
Web Summary : जालना के भोकरदन, परतूर और अंबड नगर पालिका चुनावों में सरगर्मी। प्रमुख नेताओं की ताकत का इम्तिहान। पहले दो दिनों में कोई नामांकन दाखिल नहीं, सस्पेंस बढ़ा। मंत्रियों और विधायकों की प्रतिष्ठा दांव पर।