जालना : एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून चालत्या गाडीत बलात्कार करणा-या एका तरुणासह त्याला मदत करणा-या तिघांवर मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही संशयित फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.याबाबत मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनीष पाटील यांनी माहिती दिली. पीडित युवती ही पारेगाव तांडा येथील रहिवासी आहे. पीडितेचे पंजाब सुभाष पवार (रा.दत्तापुरा तांडा, सिंदखेड) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. एक फेबु्रवारीला ती शेतात काम करत असताना, पंजाब तिथे गेला. त्याने तरुणीला मुख्य रस्त्यावरील फाट्यावर येण्यास सांगितले. तरुणी तिथे गेल्यानंतर पंजाब पवार व इतर तिघांनी तिला बळजबरीने जीपमध्ये बसवले. जीप जालन्याच्या दिशेने निघाली असताना, जालना परिसरात पंजाब पवार याने तरुणीवर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असे युवतीने रविवारी रात्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. पंजाब पवारसह त्याला मदत करणा-या संतोष पवार, अर्जुन राठोड, अविनाश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही संशयित फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे सहायक निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
बलात्कार प्रकरणातील संशयितांचा कसून शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:13 IST