संभाजीनगर येथे घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास
जालना : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ४० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना जालना शहरातील संभाजीनगर येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, जालना शहरात मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संभाजीनगर येथील व्यापारी राजेश लक्ष्मीनारायण अग्रवाल हे आपल्या मुलाला सोडण्यासाठी कुटुंबासह गुरूवारी मुंबई येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. एका इसमाने अग्रवाल यांना घरी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी लगेचच घराकडे धाव घेतली. घरी येऊन पाहिले असता, घरातील रोख रक्कम १०,००० रूपये, ५,००० डिव्हीआर व २५ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा ४० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.