फोटो
जालना : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित असलेल्या ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत आणि शासनाला जागे करण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने सोमवारी गांधी चमन येथे ताम्हण-पळी बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी जय परशुरामच्या गजराने परिसर दणाणून गेला होता.
ब्राह्मण समाजाचे अनेक प्रश्न शासन-प्रशासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य करून समाजाला न्याय द्यावा, यासाठी समाजाच्या वतीने वेळोवेळी लोकशाही मार्गाने तहसील, जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयासमोर आंदोलने करण्यात आली. मुंबईच्या आझाद मैदानावर महाधरणे करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या, परंतु त्यांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर, २०२० या दोन महिन्यांत राज्यातील आजी- माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र देऊन हिवाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांचा विचार करून ठोस निर्णय घेण्याची विनंती केली, परंतु सरकारने यावर कसलाच निर्णय न घेतल्याने १ ते २२ जानेवारीपर्यंत राज्यातील तहसील, जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण-पळी वाजवून जागो सरकार जागोचा नारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने दिला आहे.
जालना येथील आंदोलनात ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे दीपक रणनवरे यांच्यासह विलास नाईक, भाजपाचे जिल्हा संघटक सिद्धिविनायक मुळे, आर. आर. जोशी, संजय देशपांडे, अमित कुलकर्णी, अनंत वाघमारे, शशिकांत दाभाडकर, सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, सुनील जोशी, मधुसूदन दंडारे, विनोद कुलकर्णी, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे, सुलभा कुलकर्णी, अर्पणा राजे, दीपाली बिन्नीवाले, शालिनी पुराणिक, संपदा कुलकर्णी, कलाशिक्षक संतोष जोशी, आनंदी अय्यर, मुकुंद कुलकर्णी, कृष्णा दंडे, रमाकांत धर्माधिकारी, सुजाता कुलकर्णी, कल्याणी कुलकर्णी, भारती रणनवरे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न लावून धरू
या आंदोलन स्थळाला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठीही अनेक प्रयत्न केले. काही तांत्रिक कारणांमुळे ते प्रलंबितच राहिले. आताही महामंडळासह जे काही प्रश्न, मागण्या असतील, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करू, अशी ग्वाही खोतकर यांनी दिली.