मंठा : डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी टेक्नॉलॉजीच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेले शंभर उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित केले जाणार आहेत. हे उपग्रह बनविण्यासाठी देवगाव (ता. मंठा) येथील स्वप्नील मोरे यांची भारतातील १ हजार विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे. तो सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेत आहे.
७ फेब्रुवारी रोजी रामेश्वरम येथून हेलिअम बलून मार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत. भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रातून तीन विद्यार्थ्यांनी स्वत: उपग्रह बनविले आहेत. त्यात सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या स्वप्नील मोरे या विद्यार्थ्याचा समावेश आहे. हे उपग्रह बनवण्याचे ६ ऑनलाईन प्रशिक्षण झाले आहेत. आता प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याच्या प्रशिक्षणासाठी पुणे येथे १९ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी डीआरडीओचे चेअरमन यांच्या उपस्थितीत रामेश्वरम येथून हेलियम बलूनमार्फत पृथ्वीच्या कक्षेत हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत.
सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानचे विज्ञान शिक्षक विठ्ठल सरकटे म्हणाले की, रामेश्वरम येथे प्रस्थापित होणाऱ्या जागतिक विक्रमासाठी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. ही शाळेसाठी व माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे. यातून श्रीराम प्रतिष्ठानचे व मंठा शहराचे नाव जागतिक पातळीवर जाणार असून, याचा मला अतिशय आनंद होत आहे.
फोटो ओळ : सेलू येथील प्रयोगशाळेत असलेला देवगाव (ता. मंठा) येथील स्वप्नील मोरे.