बदनापूर ( जालना): येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहात बारावीत शिकणाऱ्या एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. ही घटना बुधवारी ( दि. ५) रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती संजय सुरासे असे मृत मुलीचे नाव आहे. बारावी परीक्षेला अवघे काही दिवस बाकी असताना विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
येथील तहसील परिसरात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे वसतिगृह आहे. येथे ज्योती संजय सुरासे ( 17 वर्ष रा.किन्होळा तालुका बदनापूर) ही शहरातील एका महाविद्यालयात १२ वीत शिक्षण घेत होती. तिचे वास्तव्य वसतिगृहात होते. ज्योतीने बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वसतिगृहातील आपल्या खोलीमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. ज्योती घरातील मोठी मुलगी होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली.