अंबड : आलमगाव- चांभारवाडी परिसरात यंदा ज्वारीचे पीक चांगले आले. परंतु, बदलत्या वातावरणाचा या पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सद्यस्थितीत हाती आलेले ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
भाजीपाल्यांचे दर घसरले; उत्पादक हवालदिल
अंबड : मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे उत्पादकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. गतवर्षी खरीप हंगाम वाया गेल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला, टोमॅटोसह फुलकोबीची लागवड कमी-अधिक क्षेत्रावर केली होती. सध्या उत्पादनाच्या तुलनेत भाजीपाल्याला दर मिळत नाही.
जयनगर येथील बुद्ध विहारात कार्यक्रम
जालना : शहरातील जयनगर येथील बुद्ध विहारात गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची नुकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भन्ते पय्या वंश यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास कैलास गंगावणे, सुनील गंगावणे, रवि गंगावणे, सुनीता गंगावणे, दीप्ती गंगावणे, कमल साबळे आदींची उपस्थिती होती.
शिक्षकांचे आंदोलन
जालना : मागील अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी प्राथमिक, माध्यमिकसह कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मंगळवारी मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. यात जिल्ह्यातील शेकडो शिक्षक सहभागी होणार आहेत.
निधी संकलनास प्रारंभ
घनसावंगी : अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन शोभायात्रा गावोगाव काढली जात आहे. याच अनुषंगाने जांब समर्थ येथील समर्थ रामदास स्वामी मंदिरात निधी संकलनास नुकताच प्रारंभ करण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
इंधन बचत अभियानास जाफराबादेत प्रारंभ
जाफराबाद : शहरातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारात इंधन बचत मोहिमेस नुकताच प्रारंभ करण्यात आला. यावेळी आगारप्रमुख एल. व्ही. लोखंडे, यंत्र अभियंता डी. एल. लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी यांत्रिकी कर्मचारी शेख अलीम, एस. ई. कड, जी. डी. व्यवहारे, पी. व्ही. बोराडे, एस. एस. पालवे आदींची उपस्थिती होती.
भास्कराचार्य टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात
जालना : विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानासह स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, यासाठी शहरातील चाटे कोचिंग क्लासेसच्यावतीने भास्कराचार्य टॅलेंट सर्च परीक्षेचे रविवारी मोफत आयोजन करण्यात आले होते. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी संचालक गजानन मांटे, प्रा. रक्षा मांटे, प्रा. दिनेश पवार आदींनी प्रयत्न केले.
बदनापुरात निधी संकलनास प्रारंभ
बदनापूर : अयोध्येतील श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानास रविवारी शहरात सुरुवात करण्यात आली. श्रीराम मंदिरात रामभक्त एकत्र आल्यानंतर त्यांचे गट तयार करून भागनिहाय निधी संकलनासाठी त्यांना घरोघरी पाठविण्यात आले. यावेळी जय श्रीराम यांसह विविध घोषणा देण्यात आल्या.
शहागडमध्ये पदयात्रा
अंबड : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी शनिवारी शहागड (ता. अंबड) येथे पदयात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी रामभक्तांनी पुढाकार घेतला होता. या पदयात्रेत महिला, पुरूष, वयोवृद्ध व तरूणांनी मोठा सहभाग घेतला होता. लहान मुलींच्या डोक्यावर लहान घागर, त्यात श्रीफळ, तुळस अशी पदयात्रेत परिक्रमा काढण्यात आली.
भोपळे यांचे यश
जाफराबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या विधी शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत देऊळझरी (ता. जाफराबाद) येथील रवींद्र भोपळे यांनी यश प्राप्त केले आहे. ते विधी शाखेच्या पदवी परीक्षेत प्रथम प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. याबद्दल प्रा. वाहेद पटेल, डॉ. निलेश भोसले, दीपक तांगडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
आमदार दानवे चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
जाफराबाद : टेंभुर्णी गावापासून जवळच असलेल्या भातोडी येथे आमदार संतोष दानवे चषक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजयुमो तालुकाध्यक्ष विजय परिहार, सरपंच अंकुश उगले, नितीन गावंडे, नितीन उगले, भारत भोरे, सुनील उगले, पिंटू उगले, मोहन चव्हाण आदींची उपस्थिती होती.
कर्मचारी निवास्थानाची मोठी दुरवस्था
भोकरदन : शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची मागील काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. निवास्थानाला काटेरी झुडपांचा विळखा पडलेला आहे. वारंवार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तक्रारी करूनही याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.