जालना : प्रवासादरम्यान सुट्ट्या पैशांवरून प्रवाशी आणि वाहक यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असतो. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी व वाहकांना होणारा नाहक त्रास यांची राज्य परिवहन मंडळाने दखल घेत यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्यावर भर दिला जात आहे.
जालनाएसटी विभागास पूर्वी चार डेपोत मिळून दिवसाला ७५ ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न होत असे, मात्र यूपीआयचा वापर वाढल्याने ॲपच्या माध्यमातून रोज सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. प्रवाशांकडून ॲपच्या माध्यमातून तिकीट घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयांपर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवाशी यांच्यातील सुट्ट्या पैशांवरून वाद होण्याचे प्रमाण देखील कमी झाले असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.
एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (इटीआयएम) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट दिले जाते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रवाशी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद कायमचे बंद होणार आहेत.
वाहकांकडे मशीन दिली वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात येतात, परंतु अनेकदा सुट्या पैशांवरून प्रवाशी आणि वाहक यांच्यात कुरबुर होतेच. वाद होऊ नयेत म्हणून वाहकांकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (इटीआयएम) देण्यात आलेले आहेत. यामुळे भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भवणार नाहीत. याची काळजी महामंडळाकडून घेतली जात आहे.- सुरेश टकले, वाहतूक नियंत्रक, जालना विभाग