जालना : उत्पादनात घट झाल्याने ज्वारीच्या दरात वाढ झाली असून, गव्हाचे दर ज्वारीपेक्षा घटले आहेत. बाजारपेठेत ज्वारीला श्रीमंती (दरवाढ) मिळाली असून, अनेकांनी आता गव्हाच्या चपात्या खाण्याकडे मोर्चा वळविला आहे.
मराठवाड्याच्या विविध भागांत काही वर्षांपूर्वी ज्वारी हे पीक प्रामुख्याने घेतले जात होते तर गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जात होते. पाण्याची कमी उपलब्धताही याला कारणीभूत ठरत होती. जवळपास २०२० पर्यंत ज्वारीपेक्षा गव्हाचे दर हे अधिक होते; परंतु, जलस्त्रोतांची झालेली निर्मिती आणि शेतीचे झालेले आधुनिकीकरण यात ज्वारीची लागवड घटली असून, अनेकांनी गव्हाची लागवड करण्यावर भर दिला आहे. गव्हाचे उत्पादन वाढले असून, ज्वारीच्या उत्पादनात घट झाली आहे. बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने ज्वारीचे दर आता वाढले आहेत तर अधिक दर असलेल्या गव्हाच्या किमतीत घट झाली आहे.
भाकरीच परवडायची म्हणून खायचो...
मला पूर्वीपासूनच भाकरी खाण्याची सवय आहे. भाकरीशिवाय जेवणाला चव येत नाही. ज्वारीचे दर वाढल्याने अलीकडे अनेकजण चपाती खातात.
- अप्पासाहेब हरबक
आम्ही लहानपणापासून भाकरी खाण्याला पसंती दिली आहे. भाकरी खाण्याचे शरीराला लाभ होतात. आता कधी-कधी चपाती खाण्यात येते.
- भिक्कन मोरे
आता चपातीच परवडते..
घरातील ज्येष्ठ मंडळी ज्वारीची भाकरी खाण्यावर भर देतात. ज्वारीचे लाभ अनेक आहेत. परंतु, दरवाढीमुळे सध्या अधिक प्रमाणात चपाती खाल्ली जात आहे.
- नीलेश देशमाने
यापूर्वी आवड म्हणून आम्ही भाकरी खात होतो. परंतु, ज्वारीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गव्हाच्या चपात्यांचे प्रमाण वाढले आहे. कधी-कधी भाकरीही जेवणात असते.
- हरी ढगे
आपल्या आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच
ज्वारीची भाकरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. सर्वांत मोठा लाभ म्हणजे भाकरी खाणाऱ्यांना उच्च रक्तदाब आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते. हृदयाचे आजार होण्याचे प्रमाण कमी होते.
ज्वारीची भाकर खाल्ल्याने अपचनाचा त्रास होत नाही. भाकरीत लोहचे प्रमाण अधिक असते आणि लोह शरीरासाठी अधिक चांगले असल्याचे सांगण्यात येते.
मधूमेह असलेल्या रूग्णांसाठी भाकरी खाणे आरोग्यदायी ठरते. महिलांच्या गर्भाशय पिशवीच्या आजारावरही नियंत्रण मिळविता येते. याशिवाय इतर पोषक तत्त्वे शरीराला मिळतात.
जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले
वर्षानुवर्षांपासून जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते परंतु, मागील काही वर्षांपासून ज्वारीच्या उत्पादनात घट झाली आहे तर गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने बाजारपेठेतील दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या अनेकांना चपातीशिवाय जेवण जात नाही. भाकरी खाण्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.