- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : अंतरवाली राटी मध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असून, आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सरकारकडून जरांगें पाटील यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने मराठा आंदोलक महिलांनी वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील धुळे-सोलापूर महामार्गावर आज पाच वाजेच्या दरम्यान रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी रात्री त्यांच्यावर उपोषणस्थळी सलाईन द्वारे उपचार करण्यात आले. दरम्यान, जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय निर्णय घेणार यासाठी फडणवीस सरकारला आज संध्याकाळपर्यंतचा वेळ दिला आहे.
दुसरीकडे, काही महिला आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध करत धुळे ते सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे आणि काही आंदोलकांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सूरु आहे. याची सरकार कुठलीही दखल घेत नसल्याने सरकारला जागे करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. अशी प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली.