जालना जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. असे असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाने रूप बदलल्याने जगात खळबळ उडाली आहे. राज्य शासनाने ब्रिटनहून येणाऱ्यांची तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचे सांगितले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून ब्रिटनहून येणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. जालना शहरात दोन दिवसांपूर्वीच ६ जण ब्रिटनहून आले आहेत.
यात सहकार कॉलनी येथील चार, अयोध्या नगर १ तर साई नगर येथील एकाचा समावेश आहे. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटिन करण्यात आले आहे.
एप्रिलपासून विदेशातून एकूण किती जण आले
९१ जिल्ह्यात एप्रिल महिन्यांपासून आतापर्यंत ९१ जण आले आहेत. त्यातील केवळ ४ जण पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांना शहरातील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यात सध्या ब्रिटनहून येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. इतर देशांतून येणाऱ्यांची तपासणी केली जात नसल्याचे सांगण्यात आले.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?
विदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जाते. अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात येते. अहवाल निगेटिव्ह आला तरीही त्यांना १४ दिवस क्वारंटिन राहण्याची सक्ती केली जाते. आरोग्य विभागाकडून त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. काही त्रास जाणवल्यास त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती केले जाते.