शहागड : औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार ठप्प होणारी वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. सोमवारी सलग तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम शहागड ते वडीगोद्री दरम्यान प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या एका बाजूला खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने पाठीमागून ओव्हरटेक करताना किंवा समोरून येणारे वाहन धडकण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शहागड ते वडीगोद्री रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. पुढे जाण्याच्या नादात एका पाठोपाठ वाहने थांबत गेल्याने कोंडीत आणखीच भर पडली. वडीगोद्री ते गेवराई रस्त्यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. पुढे नेमकी कशामुळे वाहतूक कोंडी झाली, हे मागच्या वाहनधारकांना कळले नाही. वडीगोद्री ते अंकुशनगर दरम्यान जाणारे ओव्हरलोड ट्रॅक्टर व उसाच्या गाड्या यांच्या एकेरी वाहतुकीमुळे ही कोंडी झाल्याचे वाहनचालक खदीर शाह यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शहागड- वडीगोद्री महामार्ग तीन तास ठप्प !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:12 IST