कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२०-२०२१ मध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी असताना जिल्हा शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने प्रशासकीय सूचनांचे पालन करून वर्षभरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवले. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. याचाच एक भाग राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधून विद्यार्थ्यांना बसविले गेले. ६ एप्रिल रोजी सदरील परीक्षा झाली. या परीक्षेतील शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी १८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये जिल्ह्यातील १७२ विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, शिक्षण विस्तार अधिकारी नारायण कुमावत, जिल्हा समन्वयक पी.एस. रायमल, कल्याण गव्हाणे आदींनी कौतुक केले आहे.
चौकट
चार वर्षे मिळणार रक्कम
निवड यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा एक हजार रुपये याप्रमाणे वर्षाकाठी बारा हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम पुढील चार वर्षांसाठी मिळणार आहे. त्यामुळे पात्रताधारक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून ४८ हजार रुपये मिळणार आहेत. सदरील विद्यार्थ्यांनी त्यांचे खाते क्रमांक, तसेच आधार क्रमांक अपडेट करून घेणे गरजेचे आहे.
तालुका मुलांची संख्या
परतूर ४७
जालना ४४
अंबड २७
बदनापूर १७
जाफराबाद १५
घनसावंगी ०९
मंठा ०८
बदनापूर ०५