स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सादरीकरण
परतूर : येथील जिल्हा परिषद प्रशालेची प्रियंका दत्ताराव मुजमुले हिने राष्ट्रगीत गायन स्पर्धेत सहभाग नोंदवून सर्वोत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सदरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापक विष्णू कदम, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, गटसमन्वयक कल्याण बागल, द.या. काटे आदींची उपस्थिती होती.
ओमशांती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
अंबड : महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यात शहापूर येथील ओमशांती विद्यालयाचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात जयश्री परमेश्वर, सुजीत घायतडक, सूरज धन्ने हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष विलास खरात, वैशाली खरात, विश्वजीत खरात, प्रशासकीय अधिकारी देशमुख, मुख्याध्यापक स्वामी कणके आदींनी कौतुक केले.
रविवारी मोफत नेत्रतपासणी शिबिर
जालना : लायन्स क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे येत्या रविवारी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सकाळी ८ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. त्यात मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर औरंगाबाद येथील लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
जांबसमर्थ परिसरात रिमझिम पाऊस
कुंभार पिंपळगाव: तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडळात मंगळवारी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार चालू होती. मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. जांबसमर्थ परिसरात अनेक नदी-नाल्यांना पाणी आले. काही ठिकाणी पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी शेत जमीन खरडून गेली. या पावसाने परिसरातील साठवण तलाव, पाझर तलाव, विहिरीत जलसाठा झाला आहे.
अर्धेगाव सहा महिन्यांपासून अंधारात
आन्वा : भोकरदन तालुक्यात आन्वा येथील वीज मंडळाच्या मनमानी कारभारामुळे मागील सहा महिन्यांपासून अर्धे गाव अंधारात आहे. विशेष म्हणजे, जळालेले दहा गट्टूे दोन महिन्यांपासून वीज मंडळाच्या जालना कार्यालयात पडून आहे. गावातील वीजपुरवठा करणारे जवळपास दहा गट्टे जळाले आहेत. त्यामुळे अर्धे गाव गेल्या सहा महिन्यांपासून अंधारात आहे. आठ दिवसांपूर्वी गावातील दोन गट्टू जळून गेले. त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला.
तळणीच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर चिखलाचे साम्राज्य
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर चिखल पसरला असून, याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. गावातील शेकडो ग्रामस्थ या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात, परंतु ऐतिहासिक वेशीपासूनच चिखल तुडवत दर्शनासाठी जावे लागत आहे. मंदिराच्या बाजूला अनेक ग्रामस्थ राहतात. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.