लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील हॉटेल व्यावसायिक संजय राऊत यांना त्यांच्या औरंगाबाद मार्गावरील आदर्श हॉटेलमध्ये घुसून तपासणीच्या नावाखाली राऊत यांना मारहाण करणा-या तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम यांच्याविरूध्द न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश चंदनझिरा पोलिसांना दिले. असे असताना गेडाम यांच्या विरोधात आठ दिवसानंतरही दाखल केला नाही. या विरोधात बुधवारी फिर्यादी राऊत व त्यांच्या समर्थकांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले. तसेच राऊत यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.बुधवारी सकाळी चंदनझिरा पोलीस ठाणे परिसरात संजय राऊत, रवी राऊत, अॅड. अर्जुन राऊत यांच्यासह व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला, विनित साहनी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत व अन्य व्यापाऱ्यांनी भेट दिली. यावेळी चंदनझिरा पोलिसांकडे न्यायालयाचे आदेश असतानाही तुम्ही गुन्हा का दाखल करत नाहीत, असा प्रश्न विचारला तसेच कोणाचा दबाव आहे काय अशी विचारणाही केली. परंतु यातील कुठलाच प्रकार नसल्याचे सांगून गेडाम हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करताना खात्याची परवानगी घ्यावी लागते असे सांगितले. परंतु आठ दिवस उलटल्यावरही गुन्हा दाखल न झाल्याने संजय राऊत जाम संतापले होते. या संतापाच्या भरात चंदनझिरा पोलीस ठाणा परिसरातील मैदानावर संजय राऊत यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सोबत असलेल्यांनी लगेचच राऊत यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या हातातील बाटली हिसकावून त्यांचा राग शांत केला.या संदर्भात पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांना विचारले असता, ते म्हणाले की, संजय राऊत यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतल्याची माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे आपण यावर प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे सांगितले. दरम्यान, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात भेट देऊन संतप्त नागरिकांची समजूत काढली. दरम्यान अॅड. अर्जुन राऊत तसेच अॅड. हरिभाऊ काकडे यांनी खिरडकर यांच्याशी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत गेडाम प्रकरणात योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी रवी राऊत यांचीही उपस्थिती होती.
पोलीस अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:53 IST