आष्टी : प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर जीवनात शिवरायांच्या विचारांची अंमलबजावणी करावी लागेल आणि छत्रपतींचे विचार आत्मसात करणे हीच खरी शिवजयंती आहे, असे मत शिवव्याख्याते धनंजय कंटुले यांनी व्यक्त केले.
परतूर तालुक्यातील पिंपळी धामणगाव येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात जे अद्वितीय आणि अनाकलनीय कार्य केले त्याचे एकमेव कारण म्हणजे सर्वसामान्य रयतेचे कल्याण हेच त्यांचे जीवनध्येय होते. हा विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला. आपणही आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ इतरांना नावे ठेवण्यात खर्च करण्यापेक्षा सकारात्मक कार्यात खर्च केला पाहिजे. तरच आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येईल, असे कंटुले यांनी सांगितले.
यावेळी सरपंच लताबाई शिर्के, उपसरपंच सुनीता पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी कृष्णा निंबाळकर, आकाश जगताप, दादा शिंदे, सचिन वाहुळे, बाळू वाहुळे, गोकुळ पवार, हनुमान शिर्के, सोनू शिर्के, सिद्धेश्वर मोगरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रल्हाद वाहुळे यांनी तर आभार संतोष खंडागळे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.