राखी पौर्णिमेनिमित्त महिला भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जातात. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. परंतु, मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे महिलांना आपल्या माहेरी जाता आले नाही. यंदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहे. त्यामुळे माहेरी जाणाऱ्या महिलांची गर्दी वाढली आहे. जालना बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता महामंडळाकडून विविध मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. यात पुणे, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, नांदेड, मेहकर मार्गावर बसेस सोडण्यात आल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नांदेड - अमृतसर
मुंबई- सिंकदराबाद
मुंबई -नांदेड
मनमाड -आदिलाबाद
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
जालना- पुणे
जालना -औरंगाबाद
जालना- बीड
जालना - बुलडाणा
बसस्थानकात गर्दी
राखी पौर्णिमेनिमित्त महिला सासरी जातात. त्यामुळे सध्या बसस्थानकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जालना बसस्थानकात गुरुवारी बसेसमध्ये मोठी गर्दी दिसली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अनेक प्रवाशांनी मास्क घातले नव्हते. शिवाय, चालक-वाहकही विनामास्क दिसून आले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महिलांना माहेरी जाता आले नाही. त्यातच यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे यंदा माहेरी जाणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, २७ बसेस सोडण्यात आल्या आहेत. यात पुणे मार्गावर ७, औरंगाबाद ८ व बीड ४, मेहकर ४ अन्य मार्गावर बसेस सोडण्यात आल्या आहेत.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, जालना