अंबडला सणासुदीत विजेचा लपंडाव
जालना : परिसरात सणासुदीच्या दिवसांत विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. अंबड शहरात सोमवारी पोळ्याच्या सणाला सतत वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहापूर ते दाढेगाव रस्ता गेला वाहून
जालना : अंबड तालुक्यातील शहापूर ते दाढेगाव रस्त्याचेही पावसामुळे बेहाल झाले. या रस्त्याच्या पुलासमोरील भागच वाहून गेला आहे. त्यामुळे शहापूर व दाढेगावचा संपर्क तुटला आहे. सुखापुरीला जोडला गेलेला हा रस्ता असल्याने ग्रामस्थ, वाहनचालकांची गैरसोय झाली.
अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनामे सुरू
अंबड : तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरे, गोठे, दुकाने, इमारतीसह शेतशिवारातील मका, सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. दरम्यान, शेवगा परिसरात महसूल व कृषी विभागाच्या पथकाने पाहणी करीत पंचनामा केला. यावेळी तलाठी सी. टी. खिल्लारे, कृषी सहायक ए. जी. मोहिते, श्रीहरी तिकांडे, रवींद्र तिकांडे, सादिक पठाण, काकासाहेब तिकांडे, मनोहर शेरे, अर्जुन शेरे, महादेव बोंगणे आदींची उपस्थिती होती.
वालसावंगी ते पारध रस्त्याची दुरवस्था
वालसावंगी : काही महिन्यांपूर्वीच वालसावंगी ते पारध रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, पारधहून केवळ अर्धाच रस्ता डांबरीकरण करण्यात आला. त्यामुळे वालसावंगी कडील उर्वरित रस्त्यावर पावसानंतर ठिकठिकाणी चिखल पसरल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही.
पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
घनसावंगी : तालुक्यातील काही भागांत दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
शहरातील खड्डे बुजविण्याची मागणी
जालना : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील खड्डे बुजविण्यात यावेत, तसेच बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक विजय पवार यांनी नगरपालिकेकडे केली आहे. येणाऱ्या काळात गणेशोत्सव , दसरा, दीपावली असे सण-उत्सव आहेत. या उत्सवामुळे बाजारात उशिरापर्यंत गर्दी राहत असते. दरम्यान, जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत.
राजर्षी कॉलजमध्ये शिक्षक दिन साजरा
जालना : येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल ॲड. ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. सुखदेव मांटे, अध्यक्षा रेवती मांटे, अन्सार सोलंकी हे हजर होते.