लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : देशाला तंत्र विज्ञानात स्व. राजीव गांधी यांनी परिपूर्ण केल्यामुळे देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली आहे. संगणक क्षेत्रात देश पुढे गेल्यामुळे युवकांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले.
जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी येथील संत भगवानबाबा मंगल कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख बोलत होते. कार्यक्रमात प्रारंभी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा विचार देशाला प्रगतीपथावर नेण्याचा असून, जनसामान्यांना न्याय हक्क मिळवून द्यायचा आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी तंत्र विज्ञानात देशाला पुढे नेऊन आधुनिक भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असेही ते म्हणाले. यावेळी अ. भा. का. सदस्य भीमराव डोंगरे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रदेश काँग्रेसचे सचिव सत्सग मुंढे, विजय कामड, डॉ. राधेशाम जैस्वाल, डॉ. विशाल धानुरे, चंद्रकांत रत्नपारखे, मोहन इंगळे, फकिरा वाघ, सोपान सपकाळ, अजीम बागवान, शेख शफीक, शाम घोरपडे, आदी उपस्थित होते.