वडीगोद्री : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेल्या एका वयोवृद्ध महिलेसह इतर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाकडून उपचारासाठी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्यत खालवली आहे. यात ६५ वर्षीय मुक्ताबाई ढेपे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे, संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य यांचा समावेश आहे. पैकी मनोज जरांगे, बाबासाहेब वैद्य यांची दि. २८ जानेवारी रोजी प्रकृती खालावली आहे. खासगी डॉक्टरांनी स्वत: येऊन त्यांची तपासणी केली. मात्र दि. २९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उपोषणकर्ते बाबासाहेब वैद्य यांचा बीपी वाढल्याने त्यांना तातडीने शहागड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज जरांगे व संबंधित महिलेने उपचार घेण्यात नकार दिला आहे.
अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट उपोषणकर्त्यांची भेट घेतली. परंतु मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ठोस भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुटणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सर्व संसारच आंदोलनस्थळी
मागील नऊ दिवसांपसून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू असून, तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र सरकारने दखल न घेतल्याने २९ जानेवारी रोजी महिलांनी आपली चूल, गॅससह आपला संसारच आंदोलनस्थळी आणला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
मराठा समाजास न्याय मिळेल : खोतकर
आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या पिछेहट झालेल्या मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. ओबीसींचे नको तर स्वतंत्ररित्या आरक्षण द्यावे, अशी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका राहिली आहे. साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण स्वत: पोहोचविणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत मराठा समाजास न्याय मिळेल, असा विश्वास माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांशी संवाद साधताना व्यक्त केला.