जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांना विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांचा घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचीही उदारहणे आहेत. असे असतानाही एकदा रूग्ण बाहेर पडला की, त्याच्याशी कसलाही संपर्क साधला जात नाही. तसेच तपासणीही केली जात नाही. त्यामुळे हे रूग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने पोस्ट कोविडमुळेही रूग्ण दगावत आहेत. यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
जालना जिल्ह्यात १२ हजार ७९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे ३३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रूग्ण निघण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका अजून टळला नाही. त्यामुळे कोरोना झालेल्या रूग्णांची काळजी घेणे गरजेचे असतानाही आरोग्य विभागातर्फे काळजी घेतली नाही. अनेकांना थकवा, खोकला, तोंडाला चव न येणे अशी लक्षणे जाणवत आहे. त्यामुळे त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रूग्ण वाऱ्यावर
जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले होते. परंतु, सध्या हे पोस्ट कोविड सेंटर नावालाच सुरू आहेत. त्यामुळे रूग्ण वाऱ्यावरच आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असतानाही अधिकारी पोस्ट कोविड रूग्णांकडे दुर्लक्ष करीत आहे.
ओपीडी सुरू
आम्ही शासकीय रूग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले आहे. परंतु, रूग्ण येत नाही. रूग्णांना डिस्चार्ज देतेवेळी काही थकवा जाणवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. आता पोस्ट कोविड रूग्णांशी संपर्क केला जाईल. काही त्रास जाणवल्यास संपर्क करावा.
- अर्चना भोसले,
जिल्हा शल्य चिकित्सक