तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील रुई ते बेलगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खराब रस्त्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तीर्थपुरी ते सुखापुरी फाटा रस्त्यामधील रुई ते बेलगावकडे जाणारा चार किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यावर चार ते पाच फुटांपर्यंत खड्डे पडले आहेत.
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हेच कळत नाही. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. खड्ड्यात पाणी असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. या अपघातांत अनेक जण जखमीही होत आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. अनेकवेळा रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.