रांजणी रेल्वे स्थानकातून औरंगाबाद - हैदराबाद, धनबाद-मनमाड या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये बसण्यासाठी आरक्षण गरजेचे असते, तसा प्रवास करता येत नाही. रांजणी येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांची गर्दी असते. मागील वर्षभरापूर्वी राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद करण्यात आले होते. रेल्वे, बस, विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. हळूहळू सर्वच व्यवहार सुरू करण्यात आले. केंद्र शासनाने विशेष रेल्वे गाड्याही सुरू केल्या. परंतु, अद्यापही पॅसेंजर गाड्या न केल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. प्रवाशांना जास्तीचे तिकीट काढून स्पेशल गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे. एक्स्प्रेस गाडीसाठी रांजणी येथून औरंगाबादला जाण्यासाठी ८० तर जालन्याला ६० रूपये मोजावे लागतात. तर पॅसेंजर गाडीसाठी औरंगाबादला जाण्यासाठी २५ तर जालन्याला १० रूपये द्यावे लागतात. सध्या येथील प्रवाशांना एक्स्प्रेस गाडीने जास्तीचे भाडे देऊन जावे लागत आहे. यामुळे प्रवाशी हैराण झाले आहे. शिवाय एक्स्प्रेस गाड्या लहान स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मी नेहमी परभणी औरंगाबाद, जालना येथे रेल्वेने जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने एक्स्प्रेस गाडीने जावे लागत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, खिशाला आर्थिक फटका बसत आहे. केंद्र शासनाने तातडीने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, असे एका प्रवाशाने सांगितले.
गेल्या दहा महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे अशक्य झाले आहे. एक्स्प्रेसमुळे तिकीट जास्त लागत आहे. यात आरक्षित तिकीट स्थानकावर मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
निलेश वालझाडे, प्रवासी