जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीवारीनिमित्त जिल्ह्यातील पालख्या, दिंड्या पंढरपूरकडे नेऊ नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी केले आहे. पंढरपुरात प्रवेश मिळणार नसल्याने जिल्ह्यातील वारकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर येथे आषाढी यात्रा दरवर्षी आषाढी शुध्द एकादशी या दिवशी भरते. यंदाची आषाढी यात्रा मंगळवारी २० जुलै रोजी भरणार आहे. या आषाढी यात्रेचा कालावधी ११ ते २४ जुलै असा राहणार आहे. शासनाने १४ जून २०२१ रोजी आषाढीवारी मर्यादित स्वरूपात साध्या पध्दतीने आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ११ ते २८ जुलै २०२१ या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. सर्व दिंडी व पालख्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र फक्त १० मानाच्या पालख्यांना मर्यादित स्वरूपात विहीत अटी व शर्तीवर पंढरपूर येथे येण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आषाढी कालावधीमध्ये पंढरपूर येथे संचारबंदी पाच दिवसांसाठी लागू करण्यात येणार आहे. इतर दिंडी व पालख्यांना शासनाने परवानगी दिलेली नसल्यामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येता येणार नाही. आषाढी वारीनिमित्त देवस्थानात करावयाचे नित्योपचार समितीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत व सामाजिक अंतर राखून, सूचनांचे काटेकोरपणे पालन करून होणार आहेत. आषाढी वारी ही २० जुलै रोजी असल्यामुळे राज्यातील विविध गावांमधून दिंड्या व वारकरी पालख्या या १५ दिवसांपूर्वी पंढरपूरकडे येत असतात. आपल्या अधीनस्त पालख्या, दिंड्या यांच्या आयोजकांना सदरची बाब निदर्शनास आणून देऊन पंढरपूरकडे प्रस्थान करू नये, असे आवाहन जालना येथील निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.