बदनापूर : तालुक्यातील मांजरगावसह काही गावांतील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील पाच दिवसांपासून गाव व परिसर अंधारात आहे. वीज नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त असून, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देवून गावाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
जालना : गेल्या वीस वर्षांपासून ज्युनिअर काॅलेजमधील शिक्षक विनावेतन शिकविण्याचे काम करत आहे. त्यांना वेतन मंजूर असूनही दिले जात नाही. त्या शिक्षकांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने करण्यात आली.
मिनी बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
भोकरदन : शहरातील महात्मा फुले चौक ते सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहापर्यंत मिनी बायपास रस्ता काढण्यात आला असून, या रस्त्याच्या कामासाठी नगर परिषदेने लाखो रुपये खर्चही केले. परंतु, पुखराजनगर शेजारील पुलाजवळील काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. तसेच ऐन रस्त्यावर असलेला विजेचा खांबही हटविण्यात आला नाही. लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ओबीसी माेर्चासाठी बदनापूर येथे बैठक
बदनापूर : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी यांची वेगळा कॉलम करून जनगणना व्हावी, यासाठी रविवारी बदनापूर येथील सावता सभागृहात तालुकास्तरीय बैठक झाली. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत ओबीसींना कसे वंचित ठेवले गेले, यावर सविस्तर चर्चा झाली. आपल्या विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असून, यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
अर्धे आव्हाना गाव तीन महिन्यांपासून अंधारात
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील टोकावर असलेल्या आव्हाना गावात विजेचा प्रश्न कायम भेडसावत आहे. आतातर या ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असल्याने मतदारांसमोर कसे जावे, असा प्रश्न निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार व पॅनलप्रमुखांना पडला आहे. मागील तीन महिन्यापासून अर्धे गाव अंधारात आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राममंदिर बांधकाम निधीसंदर्भात बैठक
तीर्थपुरी: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे भव्य मंदिर बांधकाम होणार असल्याने त्यासंदर्भात संपूर्ण भारतभर निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बजरंग दलाचे राजेंद्र चिमणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी रामेश्वर बोबडे, संजय मापारे, राम बनकर, रमेश गाडेकर, श्रीहरी वाजे, अनिल जावध, मछू भापकर आदींची उपस्थिती होती.