जामखेड : अंबड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले. परंतु, जामखेड येथील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाले असून, तातडीने अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
स्मारक बांधकामाची चौकशी करण्याची मागणी
जालना : शहरातील स्वातंत्र्य सैनिक स्मारक बांधकामाची चौकशी करून शहरातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांची नावे त्यावर नमूद करावीत, अशी मागणी जालना जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्ताराधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेशाम जायस्वाल यांनी केली आहे. मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
नंदापूर येथे कृषी सचिव डवले यांची भेट
जालना : तालुक्यातील नंदापूर येथे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांनी गावविकासाची माहिती दिली. कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर आदींची उपस्थिती होती.
बंद झालेली मराठवाडा एक्सप्रेस पुन्हा पटरीवर
जालना : मराठवाड्यातील चाकरमान्यांसाठी रक्तवाहिनी असलेली नांदेड- मनमाड ही मराठवाडा एक्सप्रेस गुरुवारपासून पुन्हा पटरीवर धावली आहे. त्यामुळे नांदेड ते औरंगाबाद ये-जा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. मराठवाडा एक्सप्रेसमधून जालना स्थानकावर सकाळी ७० प्रवासी उतरले तर औरंगाबाद- मनमाडकडे जाण्यासाठी १५ प्रवासी बसले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
दानकुंवर कन्या विद्यालयात जयंती साजरी
जालना : येथील श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या विद्यालयात साने गुरूजी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी साने गुरूजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते, आर. आर. जोशी यांनी साने गुरुजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी कवी कैलास भाले, रामदास कुलकर्णी, संदीप इंगोले, संदीप बोणकावले, संतोष लिंगायत, मुख्याध्यापिका अर्पणा पवार, चंद्रकांत दायमा, किरण शर्मा आदींची उपस्थिती होती.
जिल्हा संघटक नीलेश कुरिहे यांचा सत्कार
जालना : संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संघटकपदी शिवव्याख्याते नीलेश कुहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अर्जुन साबळे, विजय साबळे, सुनील चांदणे, संग्राम पाटील, शेख जावेद, ज्ञानेश्वर राठोड, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर कापसे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या निवडीचे स्वागत होत आहे.
जेईएस महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
जालना : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस.बी. बजाज यांनी केले. जेईएस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, उपप्राचार्य पगारे, प्रा. जगताप, प्रा. बाफना, कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. गणेश रोकडे, मनोज मेहर आदींची उपस्थिती होती.