टेंभुर्णी परिसरातील छोटे-मोठे तलाव अजूनही कोरडेच
टेंभुर्णी : जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे. परंतु, टेंभुर्णीसह अकोलादेव व परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मोठा पाऊस नसल्याने अकोलादेव येथील जीवरेखा प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ १७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर भविष्यात या भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
टेंभुर्णी परिसरात पिकांसाठी मुबलक पाऊस पडला असल्याने सध्या पीकस्थिती समाधानकारक आहे. मात्र, परिसरात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील छोटे-मोठे तलाव अजूनही कोरडेच आहेत. जाफराबाद तालुक्यातील सर्वांत मोठा मध्यम प्रकल्प असलेल्या अकोलादेव येथील जीवरेखा धरणात या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ एक फूट पाणी वाढले आहे. यामुळे टेंभुर्णीसह परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा करणारे हे धरण यावर्षी तुडुंब भरणार का, याची चिंता नागरिकांना सतावत आहे. ६.८९ दलक्षघमी क्षमता असलेले हे धरण गतवर्षी जुलै महिन्यातच तुडुंब भरले होते. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिना अर्धा उलटला तरी धरणात सध्या १७ टक्केच पाणीसाठा असल्याचे टेंभुर्णी पाटबंधारे विभागाच्या अभियंता माधुरी जुन्नारे यांनी सांगितले. यावर्षी जर धरण भरले नाही तर येणाऱ्या उन्हाळ्यात टेंभुर्णीसह परिसरातील आठ-दहा गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्ररूप धारण करू शकतो.
चौकट
रब्बी पिकांनाही होतो लाभ
जीवरेखा धरणातून १७.६ किलोमीटर लांबीचा कालवा काढण्यात आला आहे. जर हे धरण तुडुंब भरले, तर दरवर्षी रब्बी हंगामासाठी या धरणातून कालव्याद्वारे तीन वेळा पाणी सोडले जाते. या पाण्याचा लाभ अकोलादेव, टेंभुर्णी, गणेशपूर, पापळ, गोंधनखेडा, सावंगी, आदी शिवारातील जवळपास १२९९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना होतो. यावर्षी जर धरण पूर्ण भरले तर निश्चितच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठा लाभ होणार आहे.