- प्रकाश मिरगेजाफराबाद : जाफराबाद नगर पंचायतमध्ये सत्ता बदलाच्या नांदीचा खेळ सुरु आहे. एकीकडे नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष डॉ. सुरेखा लहाने ह्याच भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सहलीवर असलेल्या त्या १२ नगरसेवकांच्या राजकीय इच्छाशक्तीचे होणार काय? यावरही चर्चा रंगली आहे.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत डॉ. लहाने यांनी सोमवारी रात्री जवळपास दोन तास चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगर पंचायत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर त्यांच्या बोलण्यात दिसून आला. या कार्यक्रमात सुरुवातीला नगराध्यक्ष डॉ. लहाने यांना बोलू देण्यात येणार नाही असे दिसले, मात्र त्यांनी वेळीच सावधगिरी बाळगून शहराच्या पाणी आणि इतर समस्यांवर मत व्यक्त केले. यानंतर व्यासपीठावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि महसूल मंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. लहाने यांना ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ असे आश्वासन दिले. त्यावरही राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.
आघाडीत बिघाडी का झाली?१६ फेब्रुवारी २०२२ ला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहयोगी नगरसेवक मिळून सात जागा तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सहा, भाजपला सहयोगी चार असे एकूण १७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्या वेळी सत्तेच्या सारिपाटात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या काही नगरसेवकांची मदत घेऊन सत्ता मिळवली होती. तेव्हापासून नगर पंचायतमध्ये सत्तेचा खरा खेळ सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत असूनही आघाडीत बिघाड का झाला हे कोणी उघडपणे बोलत नाही.
कोणताही निर्णय नाहीमाजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत बैठक होऊन प्राथमिक चर्चा झाली आहे, परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस मिळाली आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगर पंचायत कार्यालय येथे विशेष सभा होणार आहे.- डॉ. सुरेखा संजय लहाने, नगराध्यक्ष, जाफराबाद