जालना : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले कच्च्या तेलाचे दर तसेच अमेरिकेकडून होणारी निर्यात कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. जालना शहरात गुरूवारी पेट्रोल प्रतिलिटर ९० रूपये ३८ पैसे तर डिझेलचे दर हे प्रतिलिटर ८१.३५ पैसे एवढे होते. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने उद्याेग, व्यवसाय बंद होते. त्यामुळे अनेकजण घरीच होते. आता अनलॉकनंतर पुन्हा या सर्वांनी उभारी घेतली आहे. विशेष करून कामगार वर्गाकडे आज तुलनेने मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा मोठा हिस्सा आहे. यामुळे अनेकजण हे आपल्या दुचाकीत किमान एक ते दोन लीटर एवढे पेट्रोल ठेवतात. त्यामुळेदेखील मागणीच्या तुलनेत विक्री वाढल्याने ही दरवाढ झाली असावी, असा अंदाज आहे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून उद्योगांची चाके गतीने फिरत असल्याने रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा परिणाम हा डिझेलच्या दरवाढीवर झाला आहे. पेट्रोल ९० रूपयांवर जाण्याची ही कदाचित गेल्या काही वर्षांतील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. आता डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमध्ये पूर्वीइतका मोठा फरक रहिला नसल्याचेही सांगण्यात आले.
चौकट
वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ
गेल्या काही वर्षात वाहन हे प्रतिष्ठेचे लक्षण राहिलेले नाही तर ती आता दैनंदिन गरज झाली आहे. शहर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. त्यामुळे वैयक्तिक वाहनांना मोठी मागणी आहे. दुचाकी आणि चारचाकी गाडी खरेदी करण्यासाठी सहज विविध बँक, वित्तीय संस्थेकडून कुठलीही अनामत रक्कम न भरताही कर्ज मिळत आहे. त्याचाही परिणाम पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढण्यात झाला आहे.
सत्यनारायण तोतला, माजी अध्यक्ष, पेट्रोल पंप असोसिएशन, जालना