लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करण्यासाठी शनिवारी गेलेल्या पथकाला ३७ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत नायब तहसीलदाराला लाथा-बुक्याने मारहाण केली. याप्रकरणी शहागड येथील ३७ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.वाळकेश्वर येथे दिवस-रात्र अवैधवाळू उपसा सुरू असून, हायवा ट्रकमधून वाहतूक केली जाते. परिसरातून मोठ्या प्रमाणावर ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याची माहिती नायब तहसीलदार अमित पुरी यांना मिळाल्याने त्यांनी याची माहिती तहसीलदार दत्ता भारस्कर यांना दिली. त्यांनी पुरी यांना घटनास्थळी जाण्याची सूचना दिल्यानुसार पुरी यांच्यासह मंडळाधिकारी शिंदे, तलाठी कृष्णा मुजमूले आदींचे पथक कारवाई करण्यासाठी वाळकेश्वर येथे शनिवारी पोहचले असता, परिसरातील गोदापत्रात सर्रासपणे जेसीबीच्या मदतीतने वाळूचा उपसा आणि वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. याबाबत उपसा करणाऱ्यांना जाब विचारला असता, त्यातील काहींनी प्रथम पुरी व पथकातील सदस्यांना शिविगाळ केली. नंतर लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याने मोठा गोंधळ उडाला.या गोंधळाचा लाभ घेत जेसीबी तसेच हायवा ट्रक घेऊन वाळू माफिया पसार झाले. याप्रकरणी पुरी यांनी गोंदी पोलीस ठाण्यात शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून जमालोद्दीन नुरमोहम्मद तांबोळी, मोहसीन करीम तांबोळी (रा. शहागड) व अन्य ३५ जणांविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास फौजदार सय्यद नासिर करीत आहेत.
वाळू तस्करांकडून नायब तहसीलदाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:47 IST